कास पठार म्हणजे निर्सगाचा अविष्कार.सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून समाविष्ट करण्यात आले आहे.
निर्सगाचा अविष्कार व सृष्टीच्या रंगाची किमया पाहण्यास कास पठारला भेट दिली पाहिजे.
कास पठार हे ऑर्किड्सचे नंदनवनच आहे. आर्किड्ची फुले अत्यंत आकर्षक व सुवासिक असतात. त्यांचे परागीभवन हे विशिष्ट कीटकांच्या मदतीने होत असते.खरेतर 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' म्हटले की, हिमालयातील ती 'पुष्प घाटी' डोळ्यांपुढे येते. पण असेच एक पठार इथे ऐन महाराष्ट्रात साता-याजवळ सह्याद्रीत या दगडधोंडय़ांच्या देशातही दडले आहे.
साता-याजवळ यवतेश्वरचा घाट ओलांडल्यावर पोहचतो..कास पठाराला जाताना नागमोडी वळणे आणि घाट संपताच विस्तीर्ण असे पठार डोळयात भरते,हेच ते ऐतिहासिक प्रसिध्द व निसर्गाची देणगी लाभलेले कास पठार.
कास पुष्प पठारावर पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या अनेक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून आली आहेत.कास पठारावर जाणारा प्रत्येकजण येथील विविधांगी फुले,फुलपाखरे आणि वनस्पतीकडे आपोआपच आकर्षिला जातो.
कास पुष्प पठारावर पुष्प आणि वनस्पतीमुळे येथील वातावरण रंगीबेरंगी असून कधी पांढरा शुभ्र, कधी लाल, निळा, जांभळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे फुले पर्यटकांच्या डोळयांचे पारणे फेडतात.नयनरम्य फुलांमुळे कास पुष्प पठार परिसर जणु धरतीवरचाच स्वर्ग असल्याचा भास येथे येणा-या प्रत्येकालाच होतो.
श्रावणात निळी सीतेची आसवे आणि लाल रंगाची तेरड्याची फुले, मध्ये-मध्ये पांढऱ्या गेंदांच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे फुललेले दिसतात. हे नयनरम्य दृष्य पाहताना प्रत्येकाचे मन हेलावून जाते. या फुलांचा बहर कमी होईपर्यंत पांढरे तुरेवाली आमरी वर येते.
जैवविविधतेच्या दृष्टीने मौल्यवान मानल्या जाणा-या जगातील 34 ठिकाणांपैकी सह्याद्री एक आहे आणि सध्या गाजत असलेले कास पठार हे सह्याद्रीत आहे.मोसमी पाऊस वेळेवर दाखल झाल्यास कास पठारावरील ऑर्किडस् वनस्पतींच्या वाढीसाठी ते हवामान अत्यंत अनुकूल असते.
एकदल वनस्पतीमधील ऑर्किडेसी कुळातील सर्व प्रजातींना ऑर्किड्स नावाने ओळखले जाते. कास पठारावरील ऑर्किड्स अती दुर्मिळ,प्रदेशनिष्ठ.जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांमध्ये कास पठाराचा समावेश होण्यात या वनस्पतींचा मोठा वाटा आहे.
सातारचे कास पठार देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. जागतिक पातळीवरही कास पठाराची नोंद घेतली गेली आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्प पठाराचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला असून आज देशवासियाबरोबरच परदेशी पर्यटकांना भुरळ घालणाने पुष्पसौदर्य नजरेत साठवून ठेवण्यासारखे आहे.
बालकवींच्या शब्दात सांगायचे झाल्यास हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे असे हे देखणे रुप म्हणजे कास पठारावरील पुष्पवैभवच आहे.
कास पुष्प पठारातील जैव विविधा जोपासण्यासाठी पयर्टकांबरोबरच सर्वांनीच स्वत:वर बंधने घालून घेणे गरजेचे आहे.पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनीच मोह टाळून या निसर्गदत्त पुष्प पठाराचे नजरेत संकलन करावे.
No comments:
Post a Comment